
कोल्हापूर : कोल्हापुरातील देवकर पाणंद ते साई मंदिर कळंबा या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. स्थानिक रहिवाशांनी या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी या रस्त्यासाठी 1 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली होती. संततधार पावसाच्या अडथळ्यानंतर या रस्त्याचे काम काही काळासाठी ठप्प झाले होते. दरम्यानच्या काळात या रस्त्याच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही राजकीय कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले. मात्र स्थानिक नागरिकांनी महापालिकेत धाव घेत उपायुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदन दिले. भाजपचे मंडल अध्यक्ष विनय खोपडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी या रस्त्या संदर्भात अडसूळ यांच्याशी चर्चा केली. यामध्ये देवकर पाणंद परिसरात राहणाऱ्या अभियंत्यांचाही समावेश होता. देवकर पाणंद चौक ते निकम पार्क या मार्गावर पावसाचे पाणी साचून राहते त्यामुळे हा 200 मीटरचा रस्ता कॉंक्रीट करावा अशी मागणी यापूर्वी महापालिकेचे शहर अभियंता आणि आमदार महोदयांकडे केली होती त्यानुसारच हे काम सुरू होते. पण गैरसमजातून हे काम बंद पाडण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याच्या दर्जाबाबत परिसरातील सर्वच नागरिक जागरूक आहेत. त्यामुळे निकृष्ट काम झाल्यास ते आमच्या निदर्शनास लगेच येईल त्यासाठी काम बंद पाडण्याची आवश्यकता नाही अशी मागणी नागरिकांनी केली. याचबरोबर परिसरातील अभियंत्यांबरोबर चर्चा करून या कामाच्या दर्जाबाबत अपेक्षित सूचनाही यावेळी उपायुक्तांसमोर मांडण्यात आल्या. या सूचना विचारात घेऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, अभय तेंडुलकर, सुधीर राणे, राजेश कोगणुळकर,संग्राम पाटील, निलेश निकम, विश्वेश कुलकर्णी, मिथुन मगदूम, प्रणित पाटील, सारंग वडियार, शांतीकुमार शेटे यांच्यासह नागरिकांचा समावेश होता.