पूरग्रस्तांसाठी आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात! स्वखर्चातून दिले १५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

Share News

कोल्हापूर : महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर आला आहे. लोकांच्या घराशिवारात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महापुराची पाहणी करून तातडीची मदत देण्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदत पाठवण्यात येत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून सोलापूर जिल्ह्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्याचा निर्णय घेतला.एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल इतके धान्य, डाळी, तेल, साबण, टूथपेस्ट, ब्लँकेट अशा जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवण्यात आले आहे. नागाळा पार्क इथल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे साहित्य ट्रकमधून सोलापूरकडे रवाना करण्यात आले. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी, अमल महाडिक यांनी राबवलेला उपक्रम अनुकरणीय आहे असे मत व्यक्त केले. कोल्हापूरवर जेव्हा महापुराचे संकट ओढवले तेव्हा महाराष्ट्रभरातून मदत येत होती. आता कोल्हापूरकरांनीही मराठवाड्याच्या मदतीला धावून जात माणुसकीचे दर्शन घडवले आहे. अमल महाडिक यांची मदत ही चांगली सुरुवात असून जिल्हाभरातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मदत गोळा करून पूरग्रस्त भागात पाठवतील अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.

आमदार अमल महाडिक यांनी बोलताना लोकप्रतिनिधी आणि जागरूक नागरिक म्हणून म्हणून संकटकाळी लोकांना साथ देणे हे माझे कर्तव्य आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ही मदत त्या पूरग्रस्त बांधवांच्या मोडून पडलेल्या संसाराला उभारण्यासाठी खारीचा वाटा ठरेल. कोल्हापुरातील दातृत्वशील व्यक्ती आणि संस्थांनीही पूरग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केले.
याप्रसंगी तानाजी पाटील, संतोष पाटील, प्रमोद पाटील, सचिन पाटील, मकरंद बोराडे, आझम जमादार, उमेश पाटील, प्रितेश दोशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
ही मदत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असून तिथून शासकीय यंत्रणेमार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!