
के.एम.टी. रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील रिक्त असणाऱ्या चालक/ वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीवरील जेष्ठ व विनियमातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. आज नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गेले ३० ते ३५ वर्षे रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या यशस्वी पाठ पुराव्यामुळेच महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील ५०८ रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले होते. यावेळी काही तांत्रिक त्रुटीमुळे के.एम.टी.तील १५६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आणि के.एम.टी.चे रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पुन्हा न्याय मिळाला आहे. यापूर्वी के.एम.टी. कडील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबतही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना न्याय दिला होता.

या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, गेली ३५ वर्षे सेवा करूनही नोकरीत कायम होत नसल्याची खंत रोजंदारी कर्मचाऱ्यांना होती. त्यांना इतक्या वर्षात कोणीच न्याय दिला नाही. परंतु, माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या समस्या शासनाला जाणवून दिल्या. याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांचे भावी आयुष्य सुधरावे, त्यांना न्याय मिळावा, इतक्यावर्ष केलेल्या सेवेचे फलित व्हावे म्हणून सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या १५६ कर्मचाऱ्यांचे जीवनमान निश्चितच सुधारणार असून, घेतलेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीचे आभार मानल असल्याचेही त्यांनी या पत्रकात म्हंटले आहे.