
कोल्हापूर : राजारामपुरी आणि शाहुपुरी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली. कोयास्को चौक, टाकाळा सिग्नल चौक, जनता बाजार, बागल चौक, बी.टी. कॉलेज चौक तसेच शाहुपुरी दुसरी गल्ली व केडीसी बँक परिसरात अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दि. १९ डिसेंम्बर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान दुचाकी व चारचाकी अशी एकूण ३० वाहने चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही वाहने स्पीकरद्वारे सूचना देऊन हटविण्यात आली.
यावेळी दुकानदार, व्यावसायिक, बँक अधिकारी व नागरिकांना वाहन योग्य ठिकाणीच पार्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यातही अशी कारवाई संपूर्ण शहरात सुरू राहणार असून वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.

ही कारवाई कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.