
कागल : सुळकूड सांगाव रोडवरील जवाहर कारखाना जॅकवेल शेजारील रस्ता खचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, या ठिकाणी तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटना व राजे प्रेमी सुळकूड यांनी केली आहे. यासंदर्भात कागल पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित ठिकाण धोकादायक वळणावर असून कागल व औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक सातत्याने असते. रस्ता एका बाजूने खचलेला असून बाजूलाच नदीचे पात्र असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. यावेळी अमोल शिवई ( संचालक राजे बँक ), प्रथमेश बाबासो पाटील , अनिकेत नामदेव हेगडे , सुहास भानुदास लगारे, विश्वास बाळासो जाधव उपस्थित होते.