
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आश्वासक वातावरण निर्माण करत प्रचाराची दिशा निश्चित केली आहे. विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशील तसं! हे घोषवाक्य पुढे करत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी रस्ते मुक्त व भ्रष्टाचारमुक्त महापालिकेची ग्वाही दिली. स्थानिकांसह देश-विदेशात वास्तव्यास असलेल्या कोल्हापूरकरांच्या अपेक्षांनाही महत्त्व दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना पुण्यासाठी महाविकास आघाडीचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीवर दबावाचे राजकारण केल्याचा आरोप करत काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून ताकतीने लढणार असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, काँग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाल्याने कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.