
कोल्हापूर : ‘ख्रिसमस’ जवळ आली की,भारतातील बहुतांश शहरांत चौकाचौकांत ‘सांता क्लॉज’च्या टोप्या विकणारे मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात. हिंदु असूनही स्वतःला पुरोगामी, सर्वधर्मसमभावी म्हणवणारी मंडळी स्वतः आणि आपल्या मुलांना या टोप्या घेऊन तथाकथित ‘सांता क्लॉज’ मुले झोपल्यावर येतो आणि त्यांच्यासाठी ‘गिफ्ट’ ठेवून जातो, ही भ्रामक कथा सांगून मुलांचे सांस्कृतिक धर्मांतरण करण्याला आरंभ करतात. पण खरंच ‘सांता क्लॉज’ होऊन गेला का? ‘सांता क्लॉज’ म्हणून येऊन मुलांना खरंच कोणी गिफ्ट देतं का? या ‘सांता’विषयी ख्रिस्ती धर्मीयांचीच काय धारणा आहे? याचा हिंदु समाज काही विचार न करता या भूलथापांना बळी पडून हिंदु मुलांना अंधश्रद्धेच्या आहारी नेत आहेत. इतर वेळी हिंदु देवतांना ‘थोतांड’ म्हणणारे आणि हिंदु प्रथा-परंपरांना विरोध करणारे आहे, या वेळी गप्प का आहेत? आम्ही समस्त हिंदु समाजाकडून आवाहन करत आहोत, ‘खरा ‘सांता क्लॉज’ येतो, हे सिद्ध करा आणि 1 लाख रुपये मिळवा !’ जर हे असे खोटे आहे, तर मुलांना भुलवू नका, असे आवाहन ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे तालुका संयोजक नितीन काकडे यांनी केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री पराग फडणीस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते.
ख्रिस्ती धर्मगुरु काय म्हणत आहेत ? ‘सांता क्लॉज’विषयी ख्रिस्ती धर्मगुरुंनीच काय म्हटले आहे, ते अतिशय धक्कादायक आहे. यातील काहीच जणांची वक्तव्ये कळली, तरी यातील खोटेपणा लक्षात येईल.
१. इटलीतील बिशप अँटोनियो स्टॅग्लियानो ‘सांता क्लॉज’च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणतात, ‘सांता क्लॉज हा एक काल्पनिक चेहरा असून कोका-कोला कंपनीने त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी त्याचा वापर केला आहे !’
२. अमेरिकेतील प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक आणि पाद्री मार्क ड्रीस्कॉल ‘सांता क्लॉज’ला ‘ख्रिसमसचा राक्षस’ म्हटले आहे, जो पालकांना आपल्या मुलांशी खोटे बोलण्यास भाग पाडतो. ‘मुलांना खोटे सांगणे की सांता अस्तित्वात आहे, हे त्यांच्या विश्वासाला तडा देण्यासारखे आहे,’ असे त्यांचे मत आहे.
३. ख्रिस्त्यांच्या ४ प्रमुख चर्चसंस्थांपैकी ‘ऑर्थोडॉक्स चर्च’मध्ये सांता क्लॉज ही संकल्पना जवळजवळ पूर्णपणे नाकारली जाते. रशिया, ग्रीस अश देशांतील ऑर्थोडॉक्स चर्च सांताऐवजी ’सेंट बेसिल’ किंवा ‘फादर फ्रॉस्ट’ यांना मानतात. त्यांच्या मते, सांता हा बाजारपेठेने तयार केलेला एक भ्रम आहे, ज्याचा ऑर्थोडॉक्स आध्यात्मिक परंपरेशी संबंध नाही. ‘अँग्लिकन चर्च’च्या मते ‘सांता ही मनोरंजक कथा असून ख्रिसमसचा केंद्रबिंदू नाही’, तर ‘प्रोटेस्टंट संस्था’ सांता क्लॉजला ‘मूर्तीपूजा’ किंवा ‘अंधश्रद्धा’ मानतात.
ख्रिस्ती धर्मगुरु आणि संस्थाच ज्या सांता क्लॉजला ‘थोतांड’ म्हणत असतांना हिंदूंनी त्याचा उदो उदो का करायचा? वेळीच सावध व्हा, आपल्या मुलांवर हिंदु धर्मानुसार संस्कार करा. लहानपणीच त्यांच्यावर ख्रिस्ती अंधश्रद्धा लादू नका. एरवी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लक्ष्य करणारी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या बाबतीत मूग गिळून बसली आहे का? ‘अंनिस’ला ‘सांता’मध्ये कोणता पुरोगामीपणा किंवा विज्ञानवादी दृष्टीकोन दिसतो, हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही हिंदु राष्ट्र समन्वय समितीने केले आहे.