
गोकुळ दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या २०२६ या नवीन वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे पार पडले.
गोकुळ दूध संघाकडून दरवर्षी दुग्ध व्यवसायाशी संबंधित अद्ययावत माहिती तसेच संघाच्या विविध सेवा–सुविधांची माहिती असलेली दिनदर्शिका जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार प्राथमिक दूध संस्थांना वितरित केली जाते. यावर्षीची दिनदर्शिका ही विशेषतः दुग्ध व्यवसायावर आधारित असून, त्यामध्ये अद्ययावत दूध संकलन पद्धती, जातिवंत म्हैस विक्री केंद्र, मुक्त गोटा संकल्पना, रेड्या संगोपन केंद्र, मायक्रो ट्रेनिंग सेंटर, लसीकरण, गोकुळ हर्बल पशुपूरक उत्पादने, गोकुळ सुधन सेंद्रिय खते, वंधत्व निवारण शिबिरे, महालक्ष्मी मिनरल मिक्सचर, महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन तसेच आयव्हीएफ संकल्पना यासंदर्भातील तांत्रिक व शास्त्रशुद्ध माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात, कमी खर्चात किफायतशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पानावर क्यूआर कोड देण्यात आला असून, संबंधित क्यूआर कोड स्कॅन केल्यास त्या पानावरील विषयाची सविस्तर, अद्ययावत व उपयुक्त माहिती थेट दूध उत्पादकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती अधिक सुलभ व प्रभावीपणे पोहोचविण्याचा
हा अभिनव उपक्रम असल्याचे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
या दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे छायाचित्र, गोकुळ प्रधान कार्यालयाची इमारत तसेच करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथील ज्योतिर्लिंग दूध संस्थेचे दूध उत्पादक सौ.अनिता व श्री.बाळू शेळके यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आले आहे. सदर म्हैस अकराव्या वेताची असून, तिच्याकडून प्रतिदिन सरासरी २० लिटर दूध उत्पादन घेतले जात आहे. यासोबतच गोकुळच्या विविध दुग्धजन्य उत्पादनांचे आकर्षक छायाचित्रेही या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दिनदर्शिका दूध उत्पादकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, प्राथमिक दूध संस्थांनी आपल्या सभासद दूध उत्पादकांना यातील माहिती वेळोवेळी सांगावी.
कार्यक्रमात संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.साळुंके यांनी दिनदर्शिकेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी संघाचे चेअरमन यांनी संघाचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, दूध संस्था, वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंके, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.