
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना नेक्स्ट जनरेशन जीएसटी, स्वदेशी उत्पादन आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेवर भर दिला. २२ सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल. देशवासीयांनी फक्त भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
२० मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी एक राष्ट्र – एक कर संकल्पनेपासून मध्यमवर्गीय आणि गरिबांसाठी होणारे फायदे, सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी सुलभता आणि राज्यांना स्वदेशी उत्पादनाला गती देण्याचे आवाहन या मुद्द्यांवर भाष्य केले.
नेक्स्ट जनरेशन जीएसटी व बचत महोत्सव
पंतप्रधान म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देश आत्मनिर्भर भारत मोहिमेकडे मोठे पाऊल टाकत आहे. उद्या सूर्योदयाच्या वेळी पुढील पिढीचा जीएसटी लागू होईल. यामुळे ग्राहकांना वस्तू स्वस्तात मिळतील.
एक राष्ट्र – एक कर
२०१४ पूर्वी विविध करांच्या चक्रव्यूहात देशातील कंपन्या अडकल्या होत्या. वाहतुकीच्या वाढत्या खर्चाचा भार सर्वसामान्यांवर पडत होता. २०१४ मध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली. आम्ही जीएसटीला प्राधान्य दिले, भागधारकांशी चर्चा केली आणि एक राष्ट्र, एक कर हे स्वप्न साकार केले, असे मोदी म्हणाले.
गरीब व मध्यमवर्गीयांना दुहेरी वरदान
गेल्या ११ वर्षांत २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, जीएसटी दरांमध्ये कपात झाल्याने घरे, टीव्ही, रेफ्रिजरेटर, बाईक-स्कूटर खरेदी करणे स्वस्त होईल. प्रवासही स्वस्त होईल.
सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी संधी
एमएसएमईंना स्वावलंबी बनवण्याचे आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, जीएसटी दरांमध्ये कपात आणि नियम सुलभ केल्याने एमएसएमईंना मोठा फायदा होईल. विक्री वाढेल आणि करभार कमी होईल. भारतात उत्पादित वस्तूंचा दर्जा जगातील सर्वोत्तम असला पाहिजे.
स्वदेशी उत्पादनाला गती – केंद्र-राज्यांचा समन्वय आवश्यक
मोदी म्हणाले, राज्य सरकारांनी स्वदेशी मोहिमेसह उत्पादनाला गती द्यावी, गुंतवणुकीसाठी वातावरण निर्माण करावे. केंद्र आणि राज्ये एकत्र आले तरच स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण होईल. मेड इन इंडिया वस्तू खरेदी-विक्री करण्याची वृत्ती प्रत्येक भारतीयाने अभिमानाने स्वीकारावी.